Rayat Shikshan Sanstha Logo

रयत शिक्षण संस्था

"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" - कर्मवीर

Karyakarta Logo

सौ. लक्ष्मीबाई पाटील

← मागे
Laxmibai Patil

प्रेरणास्थान

सौ. लक्ष्मीबाई पाटील

रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा जन्म ७ जून १८९४ रोजी वारणा नदीच्याकाठी कुंभोज जि. कोल्हापूर या ठिकाणी झाला. बालपणापासूनच त्यांना अदाक्का या नावाने ओळखले जात होते. अतिशय चंचल आणि मनमिळाव स्वभावाच्या असलेल्या अदाक्का तशाच त्या धार्मिक वृत्तीच्याही होत्या. १९१२ मध्ये भाऊराव पाटील यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. विवाहपूर्वी भाऊरावांचे कुटुंब अदाक्का यांना ओळखत होते. त्यामुळे त्यांना कधीही एकटे वाटले नाही. सासू-सासरे, नणंद, भावजय यांचा सुद्धा त्या नितांत आदर करीत. त्यांच्या उक्ती आणि कृतीतून सतत एक संस्कृती प्रतिबिंबित होत होती. त्या सतत कामात व्यघ्र असत तथापि कधीही कोणत्याही प्रकारची कामाबाबतची तक्रार करत नसत.

सातारारोड जवळ नांदगिरी येथे भाऊराव पाटील भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्तीचे पूजन करण्यासाठी गेले होते. गुहेतून जात असताना त्यांच्याजवळ असलेल्या रायफलीतून चुकून बटन दाबल्याने जवळच असलेल्या आग्या मोहाच्या मधमाशांच्या पोळ्यावर उडाले. पोळ्यातील हजारो मधमाशा कर्मवीरांच्या अंगाला चावल्या. कर्मवीर बेशुद्ध पडले. सौ. लक्ष्मी वहिनी प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या तुम्ही माझे भाऊ आहात. माझे सौभाग्य राखण्याचे काम मी तुमच्यावर सोपवते. प्रबोधनकार ठाकरे यांनी पळापळ करून सातारावरून डॉक्टर आणले. डॉक्टरांनी कर्मवीरांच्या शरीरातून हजारो काटे काढले. दुसऱ्या दिवशी भाऊरावांना बरे वाटले. ते शुद्धीवर आले. लक्ष्मीवहिनी म्हणाल्या, तुम्ही माझे सौभाग्य वाचवले. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहील. यावर प्रबोधनकार म्हणाले, वहिनी नियती या माणसाकडून पुढे काहीतरी अलौकिक कार्य करणार आहे म्हणूनच नियतीने भाऊरावांना वाचवले आहे.

भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यात वहिनींनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. कोणी विचारले तुम्हाला किती मुले आहेत, त्यावर त्या उत्तर देत की, मला ५० मुले आहेत. सर्व जातीधर्माच्या मुलांना त्या स्वतःचीच मुले मानत. एके दिवशी श्री. छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस क्र.१ या वसतिगृहातील गनी आत्तार नावाचा मुलगा आजारी असताना गावाकडून सौ. लक्ष्मी वहिनींना आई आजारी असल्याची तार आली. वहिनींनी पुन्हा उलट टपाल पाठवले. आई तुझी काळजी घेण्यासाठी तिथे अनेक जण आहेत. परंतु माझ्याकडे जो मुलगा आहे, त्याची सेवा कोण करणार. आपल्या स्वतःच्या मुलाच्या बरोबरीने वसतिगृहातील सर्व जातीधर्माच्या मुलांना लक्ष्मी वहिनींनी आईप्रमाणे समान वागणूक दिली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांना नेहमी वाटत असे की, आपण या मातृभूमीच्या सेवार्थ स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावं. त्यासाठी १९३० मध्ये सांगली जिल्ह्यातील कामेरी या ठिकाणी स्वातंत्र्यलढ्याच्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी गेले. तर या वसतिगृहात राहणाऱ्या विविध जाती-धर्माच्या गोरगरीब मुलांचे काय होणार ? असा प्रश्न सौ. लक्ष्मी वहिनींना पडला. मात्र त्यांना तुम्हाला जायचं असेल तर जा. मला जसे जमेल त्याप्रमाणे मी या वसतिगृहातील मुलांची व्यवस्था करीन. मात्र त्या आतून धास्तावलेल्या होत्या. अनेक घरची ही मुले यांचे संगोपन कसे करावयाचे. मात्र अण्णा कामेरी येथील आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी गेले. तिथे मोठा पाऊस झाला आणि ते आंदोलन स्थगित झाले. त्यामुळे पुढील अनार्थ टळला. अण्णांनी बहुजन समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा हा मांडलेला शिक्षणयज्ञ मोठ्या निष्ठेने आणि श्रद्धेने पुढे घेऊन जाण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी आपल्या माहेरहून मिळालेले शेकडो तोळे सुवर्णअलंकार या वसतिगृहातील मुलांच्या भोजनासाठी आनंदाने देऊन टाकले.

१९२८ चा एक प्रसंग असाच हृदयस्पर्शी आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये मकर संक्रांतीच्या सणाला वसतिगृहातील मुलांना गोड भोजन द्यावयाचे होते. मात्र दुकानदार उधारीवर किराणा धान्य द्यायला तयार नव्हता. वसतिगृहाचा सेक्रेटरी आप्पालाल शेख वहिनींच्याकडे आला आणि त्याने सांगितले की, दुकानदार उदार द्यायला तयार नाही. रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई (वहिनी) यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःच्या गळ्यातील सौभाग्यालंकार (मंगळसूत्र) आप्पालाल शेख यांच्याकडे दिले आणि सांगितले जा आणि मंगळसूत्र विक किंवा गहाण ठेव. पण संक्रातीचा सण सर्वांना गोड जेवण मिळालेच पाहिजे. यावर आप्पालाल शेख ते मंगळसूत्र घ्यायला तयार नसताना त्या म्हणाल्या, अरे माझा पती एवढा कर्तबगार असताना मला या मंगळसूत्राची काय गरज ? यावरून बहुरावांच्या विचारांचा किती खोल परिणाम या माऊलीवर झाला होता याची कल्पना येते.

सौ. लक्ष्मीबाई उर्फ वहिनी यांनी त्यागपूर्वक व मातेच्या ममतेने वसतिगृहाच्या छोट्या रोपट्याचा रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आज प्रचंड वटवृक्ष निर्माण केला आहे. वहिनींनी कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता वसतिगृहातील विद्यार्थ्यांची सेवा केली. विद्यार्थ्यांना आईचे प्रेम दिले, सामाजिक दृष्टी दिली, समता, बंधुता, करुणा या गुणांची जोपासना केली आणि कर्मवीरांच्या कार्यामध्ये उभ्या राहिल्या. म्हणूनच सर्वांनी कृतज्ञतापूर्वक त्यांना मातेची उपमा दिली आहे. माणसा मधला परमेश्वर शोधावा. आपण ज्या घरातून आलो, ज्या खेडेगावातून आलो, ज्या समाजातून आलो, त्या समाजाचा उद्धार करावा. आई-वडिलांचा आदर ठेवावा व कृतज्ञतापूर्वक सेवा करावी. चांगल्या प्रवृत्ती जोपासव्यात. प्रेम, बंधुभाव, समता, करुणा या मूल्यांचा झेंडा समाजामध्ये सर्वकाल दौलत ठेवावा हा संदेश रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी आपल्या कृतीतून, त्यागातून समाजापुढे ठेवला आहे.

सौ. लक्ष्मीबाईची एक आठवण अत्यंत हृदयस्पर्शी आहे. सन १९३० मध्ये बाळंतपणासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. या बाळंतपणातून उठण्याची त्यांना आशा वाटत नव्हती. ३१ मार्च रोजी गुढीपाडवा होता. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ३० मार्च १९३० रोजी लक्ष्मीबाईंनी भाऊरावांना जवळ बोलावले व त्या म्हणाल्या, मला माझा काळ डोळ्यापुढे दिसतो आहे. यात माझे काही बरे वाईट झाले तर माझ्या दोन इच्छा आहेत, त्या तुम्ही पुरे कराव्यात. या आजारात माझे काय बरे वाईट झाले तर वसतिगृहातील अस्पृश्य मुलांसह सर्वांनी मला खांदा द्यावा अशी माझी पहिली इच्छा आहे. आणखी एक मुलांचा उद्याचा पाडव्याचा सण चुकवू नका. इतके बोलून त्यांनी त्राण सोडला. मुलांनी अक्षरशा आक्रोश केला. मातेची माया आणि वास्तेल्याची छाया विद्यार्थ्यांना पुन्हा कुठून मिळणार. लक्ष्मीबाई म्हणजे असीम त्याग व अलौकिक वास्तव्य याचे जिवंत उदाहरण होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याला रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या निसिम त्यागाची साथ मिळाली नसती तर कदाचित रयत शिक्षण संस्था एवढ्या सक्षमपणे महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी एवढ्या व्यापक स्वरूपात शिक्षण प्रसार करू शकली असती का ? हा खूप अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे नतमस्तक होणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.